खेर्डीतील तीन मंदिरांतून पितळी घंटांची चोरी

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली:- दापोली तालुक्यातील खेर्डी येथील तीन प्रसिद्ध देवस्थानांमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ हजार रुपये किमतीच्या चार पितळी घंटा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी ३० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या दरम्यान झाली आहे. चोरट्यांनी खेर्डी येथील नवीन श्री चंडिका देवी मंदिर, जुने श्री चंडिका देवी मंदिर, श्री सोमय्या देवस्थान या तीन मंदिरांतील पितळी धातूच्या जड घंटा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.चोरट्यांनी एकूण २७,००० रुपये किमतीच्या चार पितळी घंटा चोरल्या आहेत.

​या घटनेबाबत रामचंद्र श्रीपत जाडे (वय ६१, रा. खेर्डी देऊळवाडी) यांनी १६ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. चोरी जानेवारीच्या अखेरीस झाली असली तरी, मंदिर कमिटीच्या बैठकीनंतर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार काल अधिकृत तक्रार देण्यात आली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले आहे.

​दापोली पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (ड) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २२/२०२६ नुसार दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.