Monday, June 29, 2026
spot_img
Home खेड खेड येथे गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या

खेड येथे गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका ४९ वर्षीय व्यक्तीने अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाडनाका परिसरातील रोहन कुसुमाकर चिखले असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ जून रोजी दुपारी १२:२९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रोहन कुसुमाकर चिखले (वय ४९, रा. महाडनाका, खेड) यांनी आपल्या राहत्या घराच्या बेडरुममध्ये छताच्या फॅनला कापडी शॉलच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ही बाब लक्षात येताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने खाजगी ॲम्ब्युलन्सने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (क्र. ५२/२०२६) केली आहे. रोहन चिखले यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत.