मृतांची संख्या दोनवर
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर बस थांब्यानजीक उभ्या गॅस टँकरला मागून धडक देत झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या अब्दुल अजीज इम्रान जसनाईक (३, रा. भोस्ते-जसनाईक-मोहल्ला) या चिमुरड्याचाही शनिवारी उपचारादरम्यान मुंबईतील अपोलो रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात माय-लेकांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चालक इम्रान मुरादअली जसनाईक (४५, रा. भोस्ते-जसनाईक मोहल्ला) हे झायलो कारने (एमएच ०८/झेड ३६९२) कुटुंबियांना घेऊन मुंबई येथून खेडच्या दिशेने येत होता. ते नातूनगर येथे उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरवरं मागून आदळले. या अपघातात गंभीर जखमी झालेली पत्नी मदिहा यांचा उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच मृत्यू झाला.
या अपघातात अब्दुल अजीज इम्रान जसनाईक, सबिया मारुख जसनाईक (३३), सेहरा मारूख जसनाईक (७) व चालक इम्रान मुरादअली जसनाईक (४५) हे जखमी झाले होते. यातील अब्दुल जसनाईक या चिमुरड्याची प्रकृती गंभीर होती. मुंबईतील अपोलो रुग्णालयात तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातप्रकरणी चालक इम्रान जसनाईक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.









