Monday, June 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कौटुंबिक वादातून वृद्ध महिलेसह मुलाला मारहाण

कौटुंबिक वादातून वृद्ध महिलेसह मुलाला मारहाण

मंडणगडमधील शिगवण येथील घटना

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील शिगवण येथे कौटुंबिक वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या हल्ल्यात ७० वर्षीय वृद्ध महिला आणि तिचा ४५ वर्षीय मुलगा जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश्री शिवाजी जगताप (वय ७०) आणि आरोपी विश्वनाथ मनोहर जगताप व विनय मनोहर जगताप (दोन्ही रा. शिगवण) हे नात्याने चुलती-पुतणे आहेत. ते एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. २६ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी आपल्या मुलासोबत घरी असताना आरोपी विश्वनाथ जगताप याने विनाकारण त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद विकोपाला गेल्यावर आरोपी विश्वनाथ जगताप याने फिर्यादीच्या मुलाला, किशोर शिवाजी जगताप याला शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर विश्वनाथ याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर लाकडी बॅटने प्रहार केला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. दरम्यान, फिर्यादीचा मुलगा किशोर हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला असता, आरोपी विनय मनोहर जगताप याने त्याला धक्का दिला. यामुळे किशोर खाली पडून त्याच्या डोक्याला डाव्या बाजूला कानावर दगडाची मार लागून जखम झाली. यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी राजेश्री शिवाजी जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मंडणगड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२, आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.