पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी; गुन्हा दाखल
चिपळूण:- दुकानात माल भरण्यासाठी माहेरून २५ हजार रुपये आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना सावर्डे-कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी पल्लवी उभयचंद मोहिरे (वय ३५, रा. सावर्डे-कासारवाडी, ता. चिपळूण) यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पती उभयचंद आत्माराम मोहिरे (वय ३८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास सावर्डे-कासारवाडी येथे हा प्रकार घडला. दुकानात माल भरण्यासाठी पल्लवी यांनी त्यांच्या आईकडून २५ हजार रुपये आणावेत, अशी मागणी उभयचंद मोहिरे याने केली. मात्र, पल्लवी यांनी पैसे आणण्यास नकार दिल्याने त्याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच ‘तुला मारून टाकेन, पेट्रोल टाकून जाळून टाकेन’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर आरोपीने पल्लवी यांच्या दोन्ही कानाखाली हाताने थापट मारली तसेच डोक्यावर हाताच्या ठोशांनी मारहाण केली. एवढ्यावर न थांबता लाकडी दांडक्याने त्यांच्या डाव्या कुशीवर तसेच उजव्या पायाच्या ढोपरावर मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर पल्लवी मोहिरे यांनी १६ सप्टेंबर रोजी रात्री १०.२१ वाजता सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.









