२५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर शहर पोलिसांनी छापा टाकून एका ५७ वर्षीय इसमाला अटक केली आहे. असीफ फक्कद्दीन काद्री (रा. अन्सार चौक, कोकणनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी सायंकाळी ५:२५ वाजण्याच्या सुमारास कोकणनगर येथील ‘अदमदीना हार्डवेअर’ दुकानाच्या गल्लीमध्ये आरोपी असीफ काद्री हा लोकांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैसे स्वीकारून कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याचे पोलिसांना आढळले. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नितीन प्रभाकर डोमणे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत आरोपीला रंगेहात पकडले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून २५१० रुपये रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य असा एकूण २५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २३६/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









