Saturday, September 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कुवारबाव येथे गणेश विसर्जन बंदोबस्तावरील होमगार्डवर जीवघेणा हल्ला

कुवारबाव येथे गणेश विसर्जन बंदोबस्तावरील होमगार्डवर जीवघेणा हल्ला

गणवेशाची कॉलर पकडून गळा दाबल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तावर तैनात असलेल्या होमगार्डने नागरिकांमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग आल्याने एका तरुणाने होमगार्डची गणवेशाची कॉलर पकडून त्याला मारहाण करत दोन्ही हातांनी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कुवारबांव येथे घडली. या घटनेत होमगार्डच्या गणवेशाचे बटन तुटून नुकसान झाले असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता कुवारबांव ग्रामपंचायतीजवळ, ता. जि. रत्नागिरी येथे घडली. याप्रकरणी २५ सप्टेंबर रोजी पहाटे ४.५७ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी व जखमी होमगार्डचे नाव मयुर मोहन पाटील (वय २६ वर्षे, व्यवसाय नोकरी/होमगार्ड, रा. पानवल आपकरेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे आहे. तर आरोपीचे नाव लखन रामचंद्र चिकोडीकर (वय २९ वर्षे, रा. उत्कर्ष नगर, सहजीवन सोसायटी, कुवारबांव, ता. जि. रत्नागिरी) असे आहे.

पोलिस नोंदीनुसार, मयुर पाटील हे कुवारबांव येथील ‘श्री ओम साई तरुण मित्र मंडळा’च्या सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी पोलिसांसोबत बंदोबस्तावर तैनात होते. गणपती विसर्जनाचा बंदोबस्त आटोपल्यानंतर ते साक्षीदारांसोबत परत जात असताना कुवारबांव ग्रामपंचायतीजवळ आरोपी लखन चिकोडीकर हा विसर्जन करून घरी परतणाऱ्या नागरिकांशी वाद घालत मारामारी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मयुर पाटील हे गणवेशात असतानाच भांडण सोडविण्यासाठी पुढे गेले. आपण पोलिसांच्या बंदोबस्तासोबत कर्तव्यावर असल्याची माहिती आरोपीला असतानाही त्याने पाटील यांच्या अंगावरील होमगार्डच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना खेचले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या मानेवर आणि तोंडावर हाताच्या थापट्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

एवढ्यावर न थांबता आरोपीने दोन्ही हातांनी मयुर पाटील यांचा गळा जोराने दाबला आणि “तुला आत्ताच ठारच मारून टाकतो,” अशी धमकी देत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या झटापटीदरम्यान मयुर पाटील यांच्या होमगार्ड गणवेशाचे एक बटन तुटून नुकसान झाले.

या घटनेनंतर मयुर पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून गु.र.नं. ३७१/२०२६ नुसार आरोपी लखन रामचंद्र चिकोडीकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १०९(१), १२१(१), १३२ आणि ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.