दापोली येथे ७ जणांवर गुन्हा, दोघे गजाआड
दापोली:- दापोली येथील मच्छी मार्केट रोडवरील सावंत बिल्डिंगसमोर कारच्या काचेवर दगड मारून नुकसान करत एका चालकाला डोक्यात काचेची बाटली मारून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या राड्यामध्ये चालकासह त्याच्या दोन चुलत भावांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील दोघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ मे रोजी दुपारी १२:४५ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी दीपक दत्ताराम शेडगे (वय ४०, व्यवसाय- खाजगी नोकरी, सध्या रा. विरार वेस्ट, पालघर; मूळ रा. टांगर, गणपतीपुळे, ता. दापोली) हे आपल्या ताब्यातील बलेनो कार घेऊन मच्छी मार्केट दापोली रोडवरील सावंत बिल्डिंगसमोरून जात होते.
यावेळी संशयित आरोपी आफ्रिदी अहमद जोगिलकर, अझर अहमद जोगिलकर, अकलाक अल्लाउद्दीन आलम (सर्व रा. खोडा दापोली) आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार अनोळखी इसमांनी बेकायदेशीर जमाव जमवला. या टोळक्याने फिर्यादी दीपक शेडगे यांच्या बलेनो कारच्या काचेवर दगड मारून काच फोडली आणि गाडीचे आर्थिक नुकसान केले.
हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर संशयित आरोपी आफ्रिदी जोगिलकर याने थेट दीपक शेडगे यांच्या डोक्यात काचेची बाटली मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच दीपक यांच्यासोबत गाडीत असलेले त्यांचे चुलत भाऊ प्रवीण प्रताप जेधे आणि स्वप्नील मास्ती शेडगे हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता, आरोपींनी त्यांनाही रस्त्यावर लाथाबुक्क्यांनी आणि हाताच्या थापटांनी बेदम मारहाण केली. आरोपींनी सर्वांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत थेट ठार मारण्याची धमकी दिली.
या मारहाणीत दीपक शेडगे, प्रवीण जेधे आणि स्वप्नील शेडगे हे तिघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी दीपक शेडगे यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(२), १८९(१), १८९(२), १९१(२), ३२४(३), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी क्र. १ आफ्रिदी अहमद जोगिलकर आणि आरोपी क्र. ३ अकलाक अल्लाउद्दीन आलम यांना १५ मे रोजी रात्री १० वाजता अटक केली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.









