अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील दाभिळ येथे घरातील बेडरुममध्ये ठेवलेली १० हजार रुपये किंमतीची १२ बोअरची सिंगल बॅरल परवान्याची बंदुक अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी यांच्या आजारपणाचा व नजरचुकीचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली असून, या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजल्यापासून ते ३ जुलै रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दाभिळ (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील फिर्यादी यांच्या घरी ही चोरी झाली. या प्रकरणी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:०८ वाजता पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
फिर्यादी इसाक याकब दळवी (वय ७८ वर्षे, रा. दाभिळ, ता. दापोली, जि. रत्नागिरी) हे घरी असताना, त्यांच्या घराच्या बेडरुममध्ये बेडच्या कोपऱ्यात त्यांची १२ बोअरची सिंगल बॅरल बंदुक ठेवलेली होती. फिर्यादी यांच्या प्रकृतीच्या आजारपणाचा फायदा घेऊन किंवा त्यांची नजर चकवून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती बंदुक स्वफायद्यासाठी चोरून नेली आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२०/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५(अ) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









