Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ओव्हरटेक केल्याच्या वादातून चर्मालय परिसरात तुफान राडा

ओव्हरटेक केल्याच्या वादातून चर्मालय परिसरात तुफान राडा

रत्नागिरी:- शहरातील वर्दळीच्या चर्मालय परिसरातील मुख्य रस्त्यावर रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ कारणावरून दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक यांच्यात मोठा राडा झाला. या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री ही घटना घडली. एका दुचाकीस्वाराने रिक्षाला ओव्हरटेक केले. याचा राग आल्याने रिक्षाचालकाने जाब विचारला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मात्र, हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. रागाच्या भरात दुचाकीस्वाराने रिक्षा थांबवून चालकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीची ही घटना पाहताच दोन्ही बाजूंचे समर्थक आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. बघता बघता दोन गटांत राडा सुरू झाला, ज्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाढता जमाव आणि तणाव पाहता पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच नियंत्रणात आणली.

पोलिसांनी दोन्ही गटांतील व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे. सध्या परस्परविरोधी जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून, दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.