Sunday, June 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी आगरनरळ येथे कौटुंबिक वादातून दिराचा वहिनीवर कोयत्याने हल्ला

आगरनरळ येथे कौटुंबिक वादातून दिराचा वहिनीवर कोयत्याने हल्ला

रत्नागिरी:- घरासमोरील जागेत कंपाउंड करण्यावरून झालेल्या वादातून सख्ख्या दिराने वहिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ बौद्धवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीची पत्नी गंभीर जखमी झाली असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५:४० च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी सुनील रामजी कांबळे (वय ५५, रा. आगरनरळ) यांचा मोठा भाऊ अनिल रामजी कांबळे हा घरासमोरील मोकळ्या जागेत जंगली झाडाझुडपांचे कंपाउंड करत होता. यावेळी फिर्यादीच्या पत्नी सुनिता सुनील कांबळे यांनी त्यांना, “आमच्या घरासमोरील जागेत कंपाउंड करू नका,” असे सांगून विरोध केला.

या गोष्टीचा राग आल्याने आरोपी अनिल कांबळे याने सुनिता कांबळे यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात हातातील कोयत्याने सुनिता यांच्या डोक्याच्या मागील बाजूस वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

याप्रकरणी सुनील कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरीतील संबंधित पोलीस ठाण्यात आरोपी अनिल रामजी कांबळे याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.