ऑफिसमध्ये ठेवलेले २ लाख ७१ हजारांचे दागिने घेऊन भामटा पसार

मंडणगड येथील घटना

मंडणगड:- माणगाव येथे मिटींगला जाण्यापूर्वी दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने ७ महिलांचा विश्वासघात करत तब्बल २ लाख ७१ हजार १०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजश्री विवेक गायकवाड (रा. विन्हे, मंडणगड) आणि त्यांच्यासोबतच्या अन्य महिलांना माणगाव येथे एका मिटींगसाठी जायचे होते. यावेळी आरोपी चंद्रकांत घाणेकर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. तेवरे, चिपळूण; सध्या रा. नाशिक) याने महिलांना सांगितले की, मिटींगच्या ठिकाणी जाताना तुमचे दागिने सोबत नेऊ नका, ते सुरक्षित राहणार नाहीत.

​त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून समीधा समाधान येरवणकर, साक्षी शंकर सोंडकर, जागृती निवृत्ती तांबुटकर, तेजस्वी मोहन सुतार, सानिका रमेश गायकवाड, सायली पांडुरंग यादव या महिलांनी आपले दागिने एका लिफाप्यात घालून चंद्रकांत घाणेकर याच्याकडे ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी दिले

मात्र, आरोपीने ते दागिने ऑफिसमध्ये न ठेवता, महिलांची दिशाभूल करून आणि त्यांचा विश्वासघात करून सर्व मुद्देमाल घेऊन पळ काढला. यामध्ये साक्षी सोंडकर यांचे १ तोळे ८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमचे छोटे मंगळसूत्र (३३ हजार रु.), सोन्याचे झुंबर (१६ हजार रु.) आणि सिमकार्ड, समीधा येरवणकर यांचे सोन्याचे टॉप्स (१३ हजार रु.) आणि १० हजार रुपयांचा ओपो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, जागृती तांबुटकर यांचे सोन्याचे कैरीच्या आकाराचे झुमके (२० हजार रु.). तेजस्वी सुतार यांचे ५ ग्रॅमचे सोन्याचे गंडा (३३ हजार रु.), सानिका गायकवाड यांचे ७ ग्रॅमची सोन्याची चैन (४६ हजार रु.) अशा एकूण किंमत २,७१,१०० रुपये मुद्देमालाचा समावेश आहे.

​या प्रकरणी राजश्री गायकवाड यांनी १० मार्च रोजी रात्री मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी चंद्रकांत घाणेकर विरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६(३) आणि ३१८(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.