रत्नागिरी जिल्ह्यात सायबर भामट्यांचा सुळसुळाट
रत्नागिरी:- जिल्ह्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून, लिंक पाठवून तसेच जास्त पैशांचे आमिष दाखवून भामट्यांनी नागरिकांच्या खात्यातून रक्कम लांबवण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत ५ सायबर गुन्हे दाखल झाले असून, यात १ कोटी २१ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
मोबाईलच्या माध्यमातून सायबर भामटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून, हे भामटे कधी कोणाच्या खात्यावर डल्ला मारतील याचा नेम राहिलेला नाही. मोबाईलवर एखादी लिंक पाठवून, बक्षीस जिंकल्याचा संदेश पाठवून, एटीएमचा पिन किंवा बँक खात्याची माहिती घेऊन, कधी अधिकारी बोलतोय असे भासवून तर कधी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून थेट नागरिकांच्या खात्यावर दरोडा घातला जात आहे. ऑगस्ट महिन्यात सायबर भामट्यांनी सहा जणांना गंडा घातला आहे. यामध्ये रत्नागिरीतील एकाला चार आणि चिपळूणमधील एकाला आणि मंडणगड तालुक्यात एकाला आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सायबर भामटे वयोवृद्ध नागरिकांना आपले सावज बनवत आहेत. त्यांना मोबाईलमधील फारसे कळत नसल्याने भामटे त्यांना सहज फसवत आहेत. जिल्ह्यात फसवणूक झालेल्या पाच जणांमध्ये चौथे वयोवृद्ध नागरिक आहेत. अनोळखी क्रमांक, संदेश किंवा सोशल मीडिया अकाऊंटवरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. या लिंकमुळे तुम्हाला बनावट संकेतस्थळावर नेले जाऊ शकते. तुमच्या मोबाईलमध्ये हानिकारक ॲप किंवा फाइल डाउनलोड होऊ शकते. त्यामुळे तुमची वैयक्तिक तसेच बँकिंग माहिती चोरली जाऊ शकते. फसवणूक झाल्यास २४ तासांत जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार करा किंवा सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविणे गरजेचे आहे.
सहा फसवणूकीच्या घटनांमध्ये ‘महानगर गॅस एजन्सीमधून बोलतोय, गॅस सप्लाय बंद होणार आहे. आम्ही तुम्हाला मदत करतो’ असे सांगून शिक्षकाच्या खात्यातून ६,४८,६५२ रुपये लांबवले. एसबीआय युनो ॲप ऑफिसमधून बोलतोय सांगून बचत खात्याची माहिती घेऊन ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ५,२६,२७९ रुपये लुटले. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी कॅन्डो ॲप डाउनलोड केले आणि ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ८,६२,४०० रुपये गायब झाले. ट्रेडिंगद्वारे कमी वेळेत जास्त नफ्याचे आमिष दाखवून पती-पत्नीच्या खात्यातून ९१,३७,०५४ रुपये लांबवले. मिनिस्ट्री ऑफ इंडियामधून बोलतोय सांगून दहशतवादाच्या तक्रारी आल्या असून, पोलिस अटकेची कारवाईची भीती दाखवून वयोवृद्ध महिलेची ८,४९,५४३ रुपयांची फसवणूक अशाप्रकारच्या ऑनलाईन फसवणूकींचा समावेश आहे. तसेच मंडणगड तालुक्यात केवायसीच्या बहाण्याने २ लाख ७६ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









