रत्नागिरी:- एमआयडीसी परिसरातील एका इमारतीत राहणार्या तरूणाकडे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची माहिती मिळताच डीवाय एस.पी. गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. केलेल्या या कारवाईत एका तरूणाला शहर पोलिसांनी अर्धा किलो गांजासह ताब्यात घेतले आहे.
रत्नागिरीत पुन्हा एकदा गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून शहर पोलीस स्थानकातील पो.ना. राहूल घोरपडे यांनी त्याबाबतची खास माहिती आपल्या खबर्याकडून मिळवली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून डीबी स्कॉडचे पथक त्या संशयितावर लक्ष ठेवून होते.
एमआयडीसी परिसरात एका कंपनीसमोर असलेल्या रस्त्यावरून जाणार्या आडमार्गावर ही इमारत असून या इमारतीत राहणार्या एका तरूणाच्या फ्लॅटवर पोलिसांनी अचानक छापा टाकला. पोलिसांचा छापा पडताच सोसायटीमधील सार्यांचीच घाबरगुंडी उडाली.
या कारवाईत पोलिसांना त्या तरूणाच्या फ्लॅटमध्ये सुमारे अर्धा किलो गांजा सापडला आहे. पंचांसमक्ष गांजा जप्त करण्यात आला. यावेळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकालादेखील घटनास्थळी पाचारण केले होते.