देवरूख:- सोशल मीडियावरील अज्ञात लिंक अथवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा प्रत्यय देवरूख परिसरात आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली एक संशयास्पद एपीके फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल हॅक करून एका २१ वर्षीय तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल ५५ हजार ५९९ रुपयांची रक्कम परस्पर लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साडवली साईनगर (ता. संगमेश्वर) येथील रहिवासी कु. कौस्तुभ संतोष सोमण (वय २१) हा ७ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात लिंकडीनचे सत्र चालू असताना उपस्थित होता. दुपारी ११ च्या सुमारास त्याच्या मोबाईलवरील इन्स्टाग्राम ॲपवर एका अनोळखी व्यक्तीकडून एपीके फाईल प्राप्त झाली. ती फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्याचा मोबाईल संशयास्पदरीत्या त्या दिवशी चार ते पाच वेळा अचानक बंद पडू लागला. दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता त्याचा फोन पुन्हा बंद पडला. त्याने तो सुरू केल्यानंतर काही वेळातच, म्हणजेच दुपारी १२.५२ वाजता त्याच्या बँक ऑफ महाराष्ट्र, देवरूख शाखेतील खात्याशी लिंक असलेल्या गुगल पे खात्यातून परस्पर ५५ हजार ५९९ रुपये अज्ञात आरोपीच्या ‘kumarrakesh2997@bpunity’ या युपीआय आयडीवर वळते करण्यात आले.
त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी कौस्तुभने खात्यावरील शिल्लक तपासली असता, आपल्या खात्यातून परस्पर मोठी रक्कम वळती झाल्याचे आणि सायबर फसवणूक झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. या आर्थिक फसवणुकीप्रकरणी कौस्तुभ सोमण याने दिलेल्या फिर्यादीवरून १ ऑक्टोबर २०२६ रोजी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५५/२०२६ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, देवरूख पोलीस या सायबर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. अनोळखी ॲप्स आणि संशयास्पद एपीके फाईल्स मोबाईलमध्ये डाऊनलोड न करण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.









