दापोली:- इको गाडीतून विनापरवाना देशी दारू व बिअरचे बॉक्स यांची वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. देशी दारू व बिअरचे बॉक्स आणि वाहन असा २ लाख ३० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दापोली बसस्थानकाजवळील चौकात ट्राफिक जाम झालेले असल्याने दापोली पोलिसांचे एक पथक या वाहतुकीचे नियमन करत असताना त्यांना एक मारूती इको (क्र. एमएच ०८ आर ८६३६) ही जाताना दिसली. या वाहनात देशी दारूचे तसेच बिअरचे बॉक्स आढळून आल्याने हे वाहन थांबवून चालकाकडे मद्य बाळगण्याचा व त्याची वाहतूक करण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली असता चालक ऋतिक संतोष लांबे याने असा कोणताही परवाना आपल्याकडे नसल्याचे सांगितल्यावर हे वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
या वाहनात २६ हजार ८८० रूपये किमतीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या १८० मिलीच्या ३३६ बाटल्या, ८ हजार रूपये किमतीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या ९० मिलीच्या २०० बाटल्या, ७ हजार २०० रूपये किमतीचे ५०० मिलीचे टुबोर्ग बिअरचे ४८ टीन, ९ हजार ६०० रूपये किमतीच्या ६५० मिलीच्या टुबोर्ग बीअरच्या ४८ बाटल्या, ७ हजार २० किमतीच्या ६५० मिलीच्या किंगफिशर बिअरच्या ३६ बाटल्या, ३ हजार ६०० रूपये किमतीचे ५०० मिलीचे किंगफिशर बीअरचे २४ टीन, ६ हजार ४८० किमतीचे लंडन प्लीसनर बिअरचे ५०० मिलीचे ४८ टीन, ११ हजार ८८० रूपये किमतीच्या ६५० मिलीच्या लंडर प्लीसनर बिअरच्या ७२ काचेच्या बाटल्या, १ लाख ५० हजार किमतीचे वाहन असा एकूण २ लाख ३० हजार ६६० रूपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करून दापोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.









