Monday, October 19, 2026
spot_img
Home खेड आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

खेड:- तालुक्यातील लोटे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लोटे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्या राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे लोटे आणि शैक्षणिक परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनीचं नाव दिव्या काळे असं आहे. ती मूळची छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होती. दिव्या ही लोटे येथील एमईएस आयुर्वेदिक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी ती लोटे परिसरातील एका खासगी खोलीत भाड्याने राहत होती. याच खोलीमध्ये तिने टोकाचे पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यानंतर तो मृत मुलीच्या पालकांच्या सुपूर्द करण्यात आला.

दरम्यान, दिव्या काळे हिने आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलले? याबाबतचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणामागील खरे कारण शोधून काढण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. पोलीस सध्या दिव्याच्या रुममेट्स असलेल्या मैत्रिणींची चौकशी करत आहेत. ती कोणत्या कारणातून तणावात होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. तपासातूनच यामागील गौप्यस्फोट समोर येण्याची शक्यता आहे.