Saturday, October 17, 2026
spot_img
Home खेड खेडमध्ये ‘स्मार्ट बाजार’ला मध्यरात्री भीषण आग

खेडमध्ये ‘स्मार्ट बाजार’ला मध्यरात्री भीषण आग

भाजीपाला खाक, अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

खेड:- शहरातील गजबजलेल्या महाडनाका परिसरातील सुप्रसिद्ध ‘स्मार्ट बाजार’ येथे मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि स्मार्ट बाजाराच्या दर्शनी भागात असलेला भाजीपाला संपूर्णपणे जळून खाक झाला. मध्यरात्रीच्या सुमारास आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे ही आग मुख्य बाजारपेठेत किंवा लगतच्या दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले आणि एक मोठा अनर्थ टळला. या आगीची बातमी समजताच खेडचे नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच युवा सैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझवण्याच्या या बचाव कार्यात स्थानिक तरुण व युवा सैनिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना मोलाचे सहकार्य केले. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, आगीचे नेमके कारण आणि एकूण झालेल्या आर्थिक नुकसानीचा सविस्तर पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.