रत्नागिरी:- शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांना रोखण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेने आपली प्लास्टिकविरोधी दंडात्मक मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू केली आहे. ‘ प्लास्टिक बंदी’ च्या या पूर्वघोषित मोहिमे अंतर्गत शनिवारी पालिकेच्या पथकाने शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजारात अचानक छापे टाकले. या धडक कारवाईत पहिल्याच दिवशी विविध व्यापारी आणि दुकानदारांकडून एकूण १४ हजार रुपयांचा रोख दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची दोन विशेष पथके शहरात तैनात करण्यात आली आहेत.
रत्नागिरी शहरामध्ये १ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांसह इतर सर्व प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, नगरपरिषदेचे संपूर्ण कामकाज नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेमुळे गेल्या महिनाभरापासून ही मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आता प्रशासकीय कामकाज पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने गेल्या शनिवारपासून ही प्लास्टिकविरोधी मोहीम अत्यंत कडक नियमांसह पुनश्च कार्यान्वित केली आहे.
शासनाकडून मिळालेल्या अधिकृत निर्देशांनुसार, १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक शीट्स किंवा प्लास्टिकचे कापड, तसेच थर्माकोलपासून बनवलेल्या विविध वस्तूंवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शनिवारच्या कारवाईत अशा प्रतिबंधित वस्तू बाळगणाऱ्या आणि त्यांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर पालिकेच्या आरोग्य पथकाने थेट कायदेशीर बडगा उगारला.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला आहे. या पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून उघड्यावर टाकण्यात आलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या पावसाच्या पाण्याने वाहत जाऊन शहरातील मुख्य नाले आणि गटारांमध्ये अडकतात. यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची मोठी शक्यता निर्माण होते. ही संभाव्य आपत्ती आणि आरोग्याचा धोका ओळखून नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने पावसाळ्याच्या तोंडावर ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्व किरकोळ व घाऊक व्यापारी, भाजी विक्रेते आणि नागरिकांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. यापुढेही शहरात पालिकेची पथके सातत्याने फिरतीवर राहणार असून नियम मोडणाऱ्यांवर आणखी कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आला आहे.









