रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गाची रखडलेली कामे आणि आंबा घाटातील प्रस्तावित भुयारी मार्ग या प्रकल्पांना गती देण्यासाठी चर्चा झाली. तसेच, कोकणातील रस्ते विकास, पायाभूत सुविधा आणि दळणवळणांच्या अनेक प्रलंबित विषयांवर सकारात्मक निर्देश देऊ, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत रत्नागिरीकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा विषय प्रामुख्याने चर्चिला गेला. महामार्गावरील प्रलंबित आणि रखडलेली कामे युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. याच धर्तीवर, महामार्गावरील टोलचे दर कमी करून सर्वसामान्य जनतेला व वाहनधारकांना मोठा दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या तसेच कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या आंबा घाटात भुयारी मार्ग उभारण्याच्या प्रस्तावावर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. दरड कोसळण्याच्या घटना आणि पावसाळ्यातील वाहतुकीचे अडथळे दूर करून हा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि गतिमान करण्यासाठी हा भुयारी मार्ग मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
जिल्ह्यातील बंदरे आणि अंतर्गत शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांच्या बांधकामासंदर्भात आणि त्यांच्या रखडलेल्या प्रक्रियेवर बैठकीत विशेष भर देण्यात आला. त्यात निवळी ते जयगड मार्ग, जयगड ते गुहागर मार्ग, चिपळूण ते सातारा मार्गाचा समावेश आहे. या तिन्ही अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्यांच्या कामांसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक असलेला निधी आणि अंतिम प्रशासकीय मंजुरी लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती सामंत यांनी गडकरी यांच्याकडे केली.









