Thursday, July 9, 2026
spot_img
Home रत्नागिरी गणपतीपुळे येथे भरतीच्या पाण्यात स्कॉर्पिओ नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकावर गुन्हा

गणपतीपुळे येथे भरतीच्या पाण्यात स्कॉर्पिओ नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे समुद्रकिनाऱ्यावर एका चालकाने अत्यंत बेजबाबदारपणे स्कॉर्पिओ गाडी थेट भरती-ओहोटीच्या संवेदनशील पट्ट्यात नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे स्वतःचा तसेच गाडीतील प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शंभू महाजन (वय २८, रा. एमआयडीसी, वापी, गुजरात) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास सागर दर्शन पार्किंगच्या शेजारी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित गणेश महाजन यांने चारचाकी गाडी सागर दर्शन पार्किंगच्या शेजारील समुद्रकिनारी भरती ओहोटी पाणी येणाऱ्या कार्यक्षेत्रात समुद्र किनारी नेऊन स्वतःच्या व त्यांच्या सोबत असलेल्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केले. या प्रकरणी पोलिस शिपाई निलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनारी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास जयगड पोलिस करत आहेत.