रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू विक्री आणि अवैध दारू विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, दापोली, खेड, जयगड आणि पूर्णगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून सहा जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी गावठी दारूची विक्री आणि साठा करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली असून यात हर्णे बंदर रोडवरील धान्य गोदामामागे झाडीच्या आडोशाला अवैध विक्रीसाठी ठेवलेली १० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी महेंद्र बाळकृष्ण चौधरी (वय ४७) याला ताब्यात घेण्यात आले. बंदर रोड सवरेवाडी येथील झोपडपट्टी परिसरात उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेली ९ लिटर हातभट्टीची दारू आणि प्लॅस्टिकचा ग्लास असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकाश बाबल्या सवरे (वय ६६) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घाणेखुंट गवळीवाडी येथे पोलिसांनी धाड टाकून ९ लिटर गावठी दारू जप्त केली. विजय लक्ष्मण महाडीक (वय ४५) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. चोरद नदीच्या बाजूला जंगलमय भागात दारू साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. येथून ९ लिटर दारू आणि साहित्य जप्त करण्यात आले असून अमोल पांडुरंग निकम (वय ३४) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली आहे यात वाटद खंडाळा ते वाटद मिरवणे रोडवर झाडाच्या आडोशाला ‘रॉयल स्टॅग’ व्हिस्की पिताना सतीश प्रकाश घडशी याला पकडण्यात आले. गोळप दाभिळवाडी बस स्टॉपवर परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी ‘मॅकडॉल नं. १’ ची बाटली घेऊन मद्यपान करणाऱ्या निखिल विजय मयेकर (वय ३१) याच्यावर पूर्णगड पोलिसांनी कारवाई केली.
जिल्ह्यातील अवैध दारू धंदे आणि टवाळखोरी मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.









