Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी फेसबुक मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

फेसबुक मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; तिघांना बेड्या

राजापूर:- सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा धक्कादायक शेवट झाला असून, राजापुरातील एका अल्पवयीन तरुणीला अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी राजापूर आणि वैभववाडी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मयूर सुर्वे, ओंकार सुर्वे आणि पंकज पवार या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

या गंभीर प्रकरणाची पार्श्वभूमी जुलै २०२५ पासून सुरू झाली. पीडित तरुणीची फेसबुकवर वैभववाडी येथील ओंकार सुर्वे याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत ओंकार आणि त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांनी तिला नापणे येथील धबधबा दाखवण्याच्या बहाण्याने नेले. तिथे वेळ झाल्याचे सांगत तिला मयूरच्या जुन्या घरी नेण्यात आले आणि तिथेच या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. या क्रूर कृत्यादरम्यान त्यांनी पीडितेच्या नकळत मोबाईलवर तिचे अश्लील व्हिडिओ देखील रेकॉर्ड केले. यानंतर १४ मार्च रोजी पंकज पवार (रा. ताम्हाणे) याने हे अश्लील व्हिडिओ पीडितेला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

या सततच्या त्रासाला आणि मानसिक दडपणाला कंटाळून पीडितेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा विचार आपल्या बहिणीकडे बोलून दाखवला. मात्र, बहिणीने तिला वेळीच आधार दिला आणि धीर दिल्याने १५ मार्च रोजी तिने राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने राजापूर पोलिसांनी ‘शून्य’ क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो वैभववाडीकडे वर्ग केला. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.