दापोलीतील घटना; दोघांनाही अटक
दापोली:- आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला व यानंतर मृतदेह विहिरीत टाकून दिला. हा संतापजनक प्रकार कोकणातील दापोली तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पती बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीवरच दापोली पोलिसांचा संशय होता त्या दिशेने तपास करून अवघ्या ४८ तासात दापोली पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला या प्रकरणात ताब्यात घेत खुनाचा छडा लावला आहे.
केशकर्तनालयाचा व्यवसाय करणाऱ्या निलेश दत्ताराम बागकर याचा खून झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पत्नी नेहा बागकर व पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चिंचघरकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दापोली शहराजवळील गिम्हवणे येथे निलेश बागकर व त्याचा भाऊ या दोघांचाही केशकर्तनालयाचा पारंपरिक व्यवसाय आहे. मृत निलेश याचे पत्नी नेहा बागकर हिच्याजवळ वाद सुरू होते. आपल्या पत्नीचे बाहेर काहीतरी सुरू असल्याचा संशय निलेश व त्याच्या काही नातेवाईकांना होता. दुसरीकडे आपल्या प्रेम प्रकरणात अडथळे असलेल्या पती निलेश याला संपवण्याचा कट पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने आठवड्यापूर्वीच रचला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्या पत्नी नेहा बागकर हिला पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी चौकशीला बोलावले होते. त्यावेळी या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी नेहा ही जात असलेल्या हॉटेलमधील कामाचे टाइमिंग व तिने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितलेले टाइमिंग यामध्ये तफावत आढळताच पोलिसांचा तिच्यावरचा संशय वाढला. यावेळी तिला पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्यात आलं होतं. मात्र बुधवारी पत्नी नेहा हिला पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान पोलिसी हिसका दाखवताच त्यावेळी तिने या खून प्रकरणाची कबुलीच पोलिसांना दिली. यावेळी कारमध्ये बसलेला निलेश व त्याची पत्नी अशा स्वरूपाचं सीसीटीव्ही फुटेजही तपासात पोलिसांच्या हाती आले आहे.
या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी नेहा बागकर हिने तिचा पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चिंचघरकर याच्या मदतीने पती निलेश बागकर याचा खून केला. नेहा, निलेश यांचे मंगेश चिंचघरकर यांच्याशी दहा-बारा वर्षांपासून घरगुती संबंध होते. त्यामुळे मंगेश याच्याबरोबर कारमधून जाताना निलेश याला कोणताही संशय आला नाही. याच सगळ्याचा फायदा घेऊन हा कट रचण्यात आला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी हर्णै येथे निलेश याची पत्नी नेहा व मंगेश या दोघांनी निलेश याला कारमधून पार्टीसाठी नेले होते. या ठिकाणी निलेश व नेहा या दोघांनीही ड्रिंक केले होते. हर्णै बायपास येथे मद्यधुंद झालेल्या निलेश याचा गळा आवळून नेहा व मंगेशने अत्यंत निर्दयीपणे खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेशचा मृतदेह कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून टाकून दिला अशीही कबुली नेहा बागकर हिने पोलीस तपासात दिली आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस पथकाने पालघर येथील विहिरीत गळ टाकून निलेश याचा मृतदेह बाहेर काढला आहे.
यादरम्यान नेहाचा प्रियकर मंगेश चिंचघरकर हा फरार झाला होता. त्याचा शोध दापोली पोलिसांनी काही तासात लावत त्याला दापोली एसटी डेपोतून एका बंद गाडीमधून बुधवारी मध्यरात्री उशिरा ताब्यात घेतले. यानंतर चौकशीनंतर त्याला अटक केली आहे. तसेच निलेशची पत्नी नेहा बागकर हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. हत्या करणे, हत्येचा कट रचणे,पुरावा नष्ट करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे ,सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली ढोले या पोलीस पथकाने या खून प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावला आहे.