Sunday, September 20, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका

पणदेरी परिसरात सलग दोन छापे, चौघांवर गुन्हे दाखल

मंडणगड:- तालुक्यातील पणदेरी परिसरात गांजा या अंमली पदार्थाचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करणाऱ्या चौघांवर मंडणगड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात हे चौघेही रंगेहात सापडले असून, त्यांच्याविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (NDPS Act) स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या अचानक झालेल्या धडक कारवाईमुळे संपूर्ण मंडणगड तालुक्यात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पहिली कारवाई १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पणदेरी गावानजीक रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय शांताराम सावंत हे गस्तीवर असताना साबर रजा अमिर बुरुणकर (वय ३०, रा. पणदेरी, ता. मंडणगड) हा बेकायदेशीरपणे गांजाचे सेवन करताना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात NDPS कायद्याच्या कलम ८(क) व २७ अन्वये गुन्हा नोंदवला.

या कारवाईनंतर अवघ्या पाऊण तासात म्हणजेच रात्री नऊ वाजून दहा मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी दुसरी कारवाई केली. पणदेरी गावानजीक नदीच्या काठावर पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम खंडू पारधी आणि त्यांच्या गस्ती पथकाला काही संशयित हालचाली दिसून आल्या. पथकाने तातडीने तेथे धाव घेतली असता तीन तरुण एकत्र बसून गांजाचे सेवन करताना रंगेहात सापडले.

यात आदेश उदय तांबे (वय ३४, रा. पेवे बौद्धवाडी, ता. मंडणगड), समीर विलास तांबे (वय २५, रा. पेवे बौद्धवाडी, ता. मंडणगड) आणि आसिफ अ. समद ठोके (वय ३०, रा. पणदेरी, ता. मंडणगड) या तिघांचा समावेश आहे. या प्रकरणी १७ सप्टेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या या अवैध प्रकारांवर मंडणगड पोलिसांनी उगारलेल्या बडग्यामुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीला आणि सेवनाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अशी मोहीम पुढेही तीव्र केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या दोन्ही घटनांचा अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत.