रत्नागिरी:- किराणा सामानाचे पैसे आणि मागील उधारीची विचारणा केल्याचा राग मनात धरून एका दुकानदारावर लोखंडी सळईने हल्ला करत डोक्यात चिऱ्याचा दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील खेडशी नाका येथे घडली. या प्रकरणी रमेश चंद्रकांत खेत्री (वय ३८, रा. खेडशी, कारवांचीवाडी) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमसिंग भवरसिंग पुरोहित (वय ४२) यांचे खेडशी नाका येथे श्री सरस्वती सुपर मार्केट नावाचे किराणा दुकान आहे. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी रमेश खेत्री हा दुकानात किराणा सामान खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी पुरोहित यांनी खरेदी केलेल्या सामानाचे पैसे तसेच यापूर्वीची थकीत उधारी देण्याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपीने दुकानाजवळ पडलेली लोखंडी सळई उचलून पुरोहित यांच्या उजव्या खांद्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दुकानाशेजारी पडलेला चिऱ्याचा दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात पुरोहित गंभीर जखमी झाले.
या घटनेप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.२१ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१) आणि ३५२ नुसार रमेश खेत्री याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा दुकानातील उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून थेट जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.









