Tuesday, November 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ६० हजारांची लाच घेताना बंदर विभागातील अधिकाऱ्यासह खासगी पंटर जाळ्यात

६० हजारांची लाच घेताना बंदर विभागातील अधिकाऱ्यासह खासगी पंटर जाळ्यात

रत्नागिरी:- परदेशी जहाजाला ‘पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट’ आणि आवश्यक चाचण्यांची परवानगी देण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या (रत्नागिरी) प्रादेशिक बंदर अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ जाळ्यात पकडले आहे. या कारवाईत लाचेचा पहिला हप्ता म्हणून ६० हजार रुपये स्वीकारणारा खासगी इसम मिलिंद तुकाराम बनप आणि मुख्य सूत्रधार प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ (वर्ग-१) या दोघांनाही एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराची (वय ३७) रत्नागिरी येथे शिपिंग एजन्सी असून, त्यांच्यामार्फत परदेशी जहाजांना सेवा आणि दुरुस्तीची कामे पुरवली जातात. नुकतेच जयगड बंदरात  आलेल्या एका नादुरुस्त परदेशी जहाजाची दुरुस्ती तक्रारदारांच्या एजन्सीने पूर्ण केली होती. या जहाजाची समुद्रात चाचणी घेण्याची परवानगी देण्यासाठी आणि जहाजाला ‘पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट’ मिळवून देण्यासाठी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ (वय ४७) यांनी तडजोडीअंती ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने लाच देण्यास संमती दर्शवल्यानंतर भुजबळ यांनी समुद्र चाचणीऐवजी ‘फायर फायटिंग ट्रायल’ची परवानगी दिली. त्यानंतर १० नोव्हेंबर २०२६ रोजी पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्रासाठी पुन्हा ८० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली.

एसीबी पथकाने १६ नोव्हेंबर रोजी तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी फोनवरून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. एकूण ८० हजार रुपयांपैकी ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता खासगी इसम मिलिंद तुकाराम बनप (वय ५३, रा. कोहिनूर क्रिस्टल, घाणेकर आळी, रत्नागिरी; मूळ रा. काळबादेवी) याच्याकडे सुपूर्द करण्यास भुजबळ यांनी सांगितले.

त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मारुती मंदिर येथील ‘हॉटेल कार्निवल’च्या रेस्टॉरंट बारमध्ये सापळा रचण्यात आला. सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटांनी मिलिंद बनप याने बंदर अधिकारी भुजबळ यांच्या वतीने तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची रोकड स्वीकारली. पैसे मिळाल्याचे त्याने तत्काळ फोन करून भुजबळ यांना कळवले. याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने झडप घालून बनप याला रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता मुख्य आरोपी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यालाही एसीबीने ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ आणि ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडाकेबाज कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, स.पो.फौ. उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, हेमंत पवार, आशिष बल्लाळ, श्रेया विचारे, राजेश गावकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य पवार यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.