स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईत २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- शांत आणि निसर्गरम्य शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चरस, गांजा आणि ब्राऊन शुगरसारख्या घातक अंमली पदार्थांची अवैध विक्री आणि वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील तरुणाई या नशेच्या विळख्यात अडकत असल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असतानाच, पोलिसांनीही याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रत्नागिरी पोलीस दलाकडून दर एक दिवसाआड अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) मोठी कारवाई करत रत्नागिरी शहरात ब्राऊन हेरॉईन (टर्की) विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत ८० हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर आणि परिसरात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शहर परिसरात नियमित पेट्रोलिंग करत होते. गस्त घालत असताना कोकणनगर ते शिवरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अजिजा बिल्डिंगजवळ दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांची चाहूल लागताच त्यांची हालचाल अधिकच संशयास्पद वाटल्याने पथकाने त्यांना तात्काळ घेराव घालून ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगलेला ‘ब्राऊन हेरॉईन’ (टर्की) हा अत्यंत घातक अंमली पदार्थ सापडून आला.
पोलिसांनी या दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे नायाब इरफान खलपे (वय २७, रा. कीर्तीनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) आणि अरबाज अबरार फकीर (वय ३०, रा. उक्ताड, फकीर मोहल्ला, चिपळूण) अशी सांगितली. रत्नागिरी आणि चिपळूण येथील हे दोन तरुण शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी एकत्र आले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असलेले आणि स्थानिक पातळीवर ८० हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन जप्त केले आहे. यासोबतच गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य असा एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे अंमली पदार्थ नेमके कोठून आणले गेले आणि शहरात ते कोणाला विकले जाणार होते, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
ही धडाकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग गोरे, हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, वैभव मोरे, गणेश सावंत आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. रत्नागिरी शहरात चरस, गांजा आणि ब्राऊन शुगरचे जाळे पसरवणाऱ्या तस्करांविरोधात पोलिसांनी उगारलेल्या या बडग्यामुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील अंमली पदार्थांची ही साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांकडून यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.









