रत्नागिरी:- हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशातून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीवरही या पाहुण्या पक्ष्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. रत्नागिरीतील काळबादेवी किनाऱ्यावर निरनिराळ्या स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा भरली असून रत्नागिरीतील पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांची पावले या किनाऱ्याकडे वळू लागली आहेत.
पक्षीनिरीक्षक विराज आठले, निकीता शिंदे आणि अक्षय तोंडवळकर यांनी रत्नागिरीच्या किनाऱ्यावरुन स्थलांतरित पक्ष्यांची नोंदी केल्या आहेत. काळबादेवी किनाऱ्यावर नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांमध्ये छोटा तुरेवाला सुरय , मोठा तुरेवाला सुरय, सामान्य सुरय, कुरव चोचीचा सुरय, युरेशियन कोरल, मोठा जलरंक, केंटिश चिखल्या, बाकचोच तुतारी, उलटचोच तुतारी या प्रजातींचा समावेश आहे. यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर खाद्य शोधणारे टर्न, तसेच चिखलमय किनारपट्टी आणि उथळ पाणथळ जागांमध्ये वावरणारे विविध प्रकारचे किनारपक्षी पाहायला मिळत आहेत. भारतीय किनारपट्टीवर येणाऱ्या अनेक स्थलांतरित पक्ष्यांचा प्रवास उत्तर गोलार्धातील थंड प्रदेशांपासून सुरू होतो. सायबेरिया, रशिया, मंगोलिया, मध्य आशिया आणि युरोपमधील काही भाग हे या पक्ष्यांचे प्रजनन अधिवास आहेत.
काळबादेवी किनाऱ्यावर नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांमध्ये युरेशियन कोरल, बाकचोच तुतारी आणि उलटचोच तुतारी यांसारखे पक्षी उत्तर युरेशियातील प्रजनन क्षेत्रांतून दक्षिणेकडे स्थलांतर करतात. उलटचोच तुतारी हा फिनलंडपासून बैकल सरोवरापर्यंतच्या प्रदेशात प्रजनन करतो आणि हिवाळ्यात भारतासह दक्षिण आशियातील किनारपट्टीवर आढळतो. तर बाकचोच तुतारी हा आर्क्टिक सायबेरियातील प्रजनन अधिवासातून आफ्रिका, भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या प्रदेशांकडे स्थलांतर करतो. मोठा जलरंक हा प्रामुख्याने उत्तर-पूर्व आशिया आणि सायबेरियातील प्रजनन क्षेत्रांशी संबंधित किनारपक्षी आहे. हिवाळ्यात त्याचे वास्तव्य दक्षिण-पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियातील किनारपट्टीवर असते. भारतातील काही किनारपट्ट्यांवरही त्याची नोंद होत आहे. दुसरीकडे युरेशियन कोरल हा युरोप आणि उत्तर आशियातील प्रजनन क्षेत्रांतून हिवाळ्यात दक्षिणेकडे स्थलांतर करतो.
समुद्रकिनाऱ्यांवर टर्न पक्ष्यांचीही मांदियाळी
किनारपट्टीवर नोंदविण्यात आलेल्या टर्न पक्ष्यांमध्ये तुरेवाला सुरय, मोठा तुरेवाला सुरय, सामान्य सुरय आणि कुरव चोचीचा सुरय यांचा समावेश आहे. यापैकी सामान्य सुरय युरोप आणि उत्तर आशियातील प्रजनन क्षेत्रांतून भारतासह विषुववृत्तीय आणि दक्षिण गोलार्धातील प्रदेशांकडे स्थलांतर करतो. काही युरोपीय लोकसंख्यांचा प्रवास मध्यपूर्व आणि अरबी समुद्रमार्गे भारतीय किनारपट्टीपर्यंत पोहोचतो. तर छोटा तुरेवाला सुरय आणि मोठा तुरेवाला सुरय या प्रजातींचे वास्तव्य उष्णकटिबंधीय समुद्रकिनारे आणि बेटांशीही संबंधित आहे. या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये प्रजनन क्षेत्रानुसार फरक आढळतो.









