चिपळुणातील शारदा मंगल कार्यालयातील घटना; गुन्हा दाखल
चिपळूण:- तालुक्यातील कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या एका साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान वराच्या रूममध्ये ठेवलेल्या हँडबॅगमधून १ लाख ८७ हजार ३४९ रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविराेधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. जागृती संदेश मोरे (वय ३२, रा. नाना सोसायटी, कोपरी, ठाणे पूर्व) असे फिर्यादी असलेल्या महिलाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात घडला. फिर्यादी सौ. जागृती मोरे यांनी आपले सोन्याचे मंगळसूत्र आईकडे सांभाळण्यासाठी दिले होते. त्यांच्या आईने ते मंगळसूत्र आपल्या हँडबॅगमध्ये ठेवले आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी त्या बॅगेसह मंगल कार्यालयात गेल्या होत्या.
कार्यक्रमादरम्यान आईने सोन्याच्या मंगळसूत्राचा बॉक्स असलेली हँडबॅग वराच्या रूममध्ये ठेवली होती. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने व स्वतःच्या फायद्यासाठी त्या बॅगमधून १ लाख ८७ हजार ३४९ रुपये किमतीचे ४४.४८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र पट्टीचे डिझाईन असलेले व दोन सोन्याच्या डवल्या असलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
या घटनेनंतर फिर्यादींनी आपल्या नातेवाईकांकडे याविषयी चौकशी केली. मात्र उशिरापर्यंत पत्ता लागल्याने अखेर विलंबाने चिपळूण पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (अ) अन्वयॆ अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, सीसीटीएनएस कार्यप्रणालीद्वारे पुढील तपास सुरू आहे.









