Tuesday, July 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरीत सायबर गुन्हेगारांचे मोठे जाळे उघड; ५२ फसवणुकीच्या गुन्ह्यांत बँक खात्याचा गैरवापर

रत्नागिरीत सायबर गुन्हेगारांचे मोठे जाळे उघड; ५२ फसवणुकीच्या गुन्ह्यांत बँक खात्याचा गैरवापर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजीनगर शाखेतील एका बँक खात्याचा वापर करून देशभरातील ५२ सायबर गुन्हे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर गुन्हेगारांचे मोठे जाळे उघड झाले आहे.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरदेशभरातून विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने सायबर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजीनगर शाखेतील खाते क्रमांक ६०५५९९५८६२९ (IFSC: MAHB0000451) हे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. १ जानेवारी २०२६ पासून ते आजपर्यंत या खात्याचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी देशपातळीवर नागरिकांची फसवणूक केली आहे.

फिर्यादी वैभव शंकर शिवलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयीत खातेधारक आणि त्याच्या इतर अज्ञात साथीदारांनी संगनमत करून देशभरातील ५२ विविध सायबर तक्रारींमधील नागरिकांना विविध आमिषे दाखवून, दिशाभूल करून आणि तोतयेगिरी करून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) आणि भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४१९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या बँक खात्याचा मूळ धारक कोण आहे आणि या रॅकेटमध्ये नेमके कोण कोण सामील आहे, याचा कसून तपास करत आहेत. सायबर गुन्हेगारांनी आपल्या फसवणुकीसाठी रत्नागिरीतील बँक खात्याचा वापर केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.