Saturday, November 7, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सुनेच्या मारहाणीत जखमी वृद्ध महिलेचा अखेर मृत्यू

सुनेच्या मारहाणीत जखमी वृद्ध महिलेचा अखेर मृत्यू

संगमेश्वर:- ज्या वयात मायेची ऊब आणि आधाराची गरज असते, त्याच वयात अंगावर पडलेल्या लाकडी दांडक्याचे घाव सहन करत संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथील ९१ वर्षीय जलेखा इसाक मोडक या वृद्ध माऊलीने अखेर जगाचा निरोप घेतला. सुनेने केलेल्या कथित मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, नात्यांमधील ओलावा संपून माणुसकी कशी संपत चालली आहे याचे सुन्न करणारे वास्तव पुन्हा समोर आले आहे.

नायरी येथील राहत्या घरी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या अमानुष प्रकाराने सर्वांचे मन हेलावून टाकले होते. सतत घरात बसून वृद्ध सासूची देखभाल करावी लागते, आपल्याला कुठेही फिरायला जाता येत नाही या केवळ क्षुल्लक कारणावरून सून नाशिरा अस्लम मोडक हिने स्वतःच्या ९१ वर्षांच्या सासूवर लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी अमानुष हल्ला चढवला होता. या मारहाणीत वृद्धेच्या दोन्ही पायांना, गुडघ्याला तसेच हाताच्या मनगटाला गंभीर दुखापती झाल्या होत्या. या प्रकरणी वृद्धेची कन्या जैबुनिसा निजामुद्दीन लांबे यांनी पनवेल पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर सुनेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या शारीरिक आणि मानसिक आघातातून वृद्ध जलेखा मोडक सावरू शकल्या नाहीत आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी नायरी येथे आणण्यात येत असून, या दुर्दैवी मृत्यूनंतर आता शवविच्छेदन अहवाल काय येतो आणि पोलीस या प्रकरणात कोणती कठोर कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.