खेड:- खेड शहरातील महाडनाका परिसरातील सरिता अपार्टमेंट येथील रहिवासी असलेले ४७ वर्षीय महेश सोनू आग्रे यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महाडनाका परिसरासह संपूर्ण खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास महेश आग्रे हे आपली पत्नी श्वेता यांना “मी बाहेर जाऊन लगेच परत येतो” असे सांगून घरातून निघाले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत आणि त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही. नातेवाईक आणि संभाव्य ठिकाणी शोधाशोध करूनही त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने, अज्ञात इसमाने त्यांचे अपहरण केल्याची खात्री कुटुंबीयांना झाली.
या प्रकरणी त्यांचा २० वर्षीय मुलगा वेदांत महेश आग्रे याने खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारे खेड पोलिसांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.१८ वाजता अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ३४५/२०२६ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. महेश आग्रे हे अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अपहृत व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.









