महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा इशारा : पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
चिपळूण:- खाजगी फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना आणि बेकायदेशीरपणे गाड्या ओढून जप्त करण्याच्या प्रकारांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक झाली आहे. या बेकायदेशीर कारवायांचा निषेध करण्यासाठी येत्या २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यासमोर तीव्र धरणे निदर्शने आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती समितीचे विभागीय संघटक श्री. अनिकेत शेखर साळवी यांनी दिली आहे.
या संदर्भात चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मॅगडे, रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने लेखी निवेदन देऊन आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली आहे.
अनिकेत साळवी यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या ताब्यातील ‘MH09 AG 9997’ या क्रमांकाचा ट्रक चोरीला गेल्याबाबतची सविस्तर तक्रार त्यांनी दि. २० जून २०२६ रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात अर्जाद्वारे दिली होती.
मात्र, या तक्रार अर्जाच्या चौकशीदरम्यान अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल श्री. अभिजित सकपाळ (पो.हे.कॉ. १२२२) हे फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालत असून, वाहनांच्या बेकायदेशीर री-पझेशन आणि गैरकृत्यांना थेट सहकार्य करत असल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे.
फायनान्स कंपन्यांची गुंडगिरी आणि त्यांना पोलीस प्रशासनातील काही घटकांकडून मिळणारे अभय, हा प्रकार शासन, प्रशासन आणि समाजाच्या पटलावर आणून अशा बेकायदेशीर प्रवृत्तींचा तीव्र निषेध करण्यासाठी हे आंदोलन उभारले जात आहे.
दरम्यान, या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष अनंत शिंदे आणि उत्तर जिल्हा अध्यक्ष मुजफ्फर उर्फ राजेश मुल्ला यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
“बेकायदेशीरपणे वाहने जप्त करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. २९ ऑक्टोबरच्या आंदोलनात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.”
– श्री. अनिकेत शेखर साळवी (विभागीय संघटक, महाराष्ट्र लोकाधिकार समिती)









