Saturday, July 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी पोलिसांकडून ८९ लाखांच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

रत्नागिरी पोलिसांकडून ८९ लाखांच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या सुमारे ८९ लाख ७२ हजार ५ रुपयांच्या अंमली पदार्थांची यशस्वी विल्हेवाट लावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या समितीने सन २०१९ ते २०२६ या कालावधीत एन.डी.पी.एस. कायद्यान्वये दाखल असलेल्या ११ गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी न्यायालयाची परवानगी मिळवली आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मान्यतेने तळोजा येथील एम.डब्ल्यू.एम.एल. प्रकल्पात हे अंमली पदार्थ नेले.

या कारवाईमध्ये एकूण १० किलो ४९ ग्रॅम गांजा, ४३ गांजाची रोपे, ९ किलो ७८ ग्रॅम चरस आणि ९२६ ग्रॅम कोकेन (युरिया) या अमली पदार्थांचा समावेश होता. हे सर्व पदार्थ उच्च तापमानात जाळण्याच्या (इन्सिनरेशन) पद्धतीने नष्ट करण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे अमली पदार्थांच्या विरोधातील लढाईला बळ मिळाले असून, पोलीस दलाच्या या पारदर्शक कार्यवाहीचे कौतुक होत आहे. जिल्ह्यात ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे या समितीचे अध्यक्ष आहेत.