Sunday, October 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी तरुणीचा विनयभंग करणारा संशयित डॉक्टर पसार

तरुणीचा विनयभंग करणारा संशयित डॉक्टर पसार

रत्नागिरी:- तालुक्यातील एका खासगी क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा डॉक्टरने तपासणीच्या बहाण्याने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती, संबंधित तरुणीला सहा ऑक्टोबरपासून सर्दी आणि तापाचा त्रास होत असल्याने ती उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून इंजेक्शन व औषधे दिल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यानंतर ९ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इतर त्रासावरील उपचारासाठी पिडिता आपल्या आईसोबत पुन्हा क्लिनिकमध्ये गेली. त्यावेळी तपासणी कक्षात एकटी असल्याचे पाहून डॉक्टरने गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. घडलेल्या प्रकारानंतर भेदरलेल्या तरुणीने क्लिनिकबाहेर आल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.

कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर १६ ऑक्टोबरला रात्री पीडितेने पोलिस ठाण्यात जाऊन संशयित डॉ. सचिन गिजबिले याच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. डॉक्टर पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.