रत्नागिरी:- कमी झालेला पाऊस, वाढती उष्णता आणि बाष्पीभवनामुळे जलसाठ्यांवर पडणारा संभाव्य ताण लक्षात घेता रत्नागिरी शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी सहा महिन्यांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पालिका आणि पाटबंधारे विभागाकडून नियोजन सुरू असून, आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय विचाराधीन आहे. सध्या दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात असून, त्यात आणखी एका दिवसाची भर पडण्याची शक्यता आहे.
याबाबतचा अंतिम निर्णय अहवाल आणि सर्वसाधारण सभेतील चर्चेनंतर घेतला जाणार आहे.
यंदा जिल्ह्यातील पावसाचे दिवस कमी झाल्याने जलसाठ्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी सरासरी ११२ दिवस पाऊस पडत असताना यंदा हा कालावधी सुमारे ८४ ते ८५ दिवसांवर आला आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढत आहे. धरणांमध्ये सध्या पाणीसाठा उपलब्ध असला, तरी पुढील सहा महिने आणि आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे.
शहरातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी रत्नागिरी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती पाणी सभापती निमेश नायर यांनी दिली. पानवल धरणात पुरेसा पाणीसाठा असला, तरी धरणापासून नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे १३०० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण आहे. या कामासाठी ठेकेदाराला ७५ लाख रुपये देण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
शीळ धरणावरील जुनी जॅकवेल विहीर कोसळल्याने तिची दुरुस्ती, नव्याने बांधकाम आणि पंप बसविण्यासाठी ५६ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जलवाहिनी, विहिरी आणि अन्य जलस्रोतांचे बळकटीकरण करून शहराच्या पाणीपुरवठ्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू असले, तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. पिण्याचे पाणी अनावश्यकपणे वाया घालवणे टाळणे, गरजेपुरतेच पाणी वापरणे आणि पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ येऊ नये आणि आगामी उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी रत्नागिरीकरांनी आतापासूनच पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.









