Saturday, October 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी हत्येला वर्ष उलटले, तरी मारेकरी मोकाटच!

हत्येला वर्ष उलटले, तरी मारेकरी मोकाटच!

न्यायासाठी लेकीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

पाचल:- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे वैशाली शांताराम शेट्ये (वय ६८) या वृद्ध महिलेचा राहत्या घरी खून होऊन वर्ष उलटले, तरी या प्रकरणाचा उलगडा झालेला नसल्याने त्यांच्या एकुलत्या एक मुलीने न्यायासाठी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. सौ. जानवी जयेश पाथरे (माहेरचे नाव रूपाली शेट्ये) यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करून आईच्या हत्येचा तपास अद्याप पूर्णत्वास का पोहोचलेला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

वैशाली शेट्ये यांचा १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रायपाटण येथील राहत्या घरी खून झाला होता. या घटनेनंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला; मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही हत्येमागील सत्य समोर आलेले नाही. आपल्या आईला न्याय मिळावा आणि तिच्या हत्येमागे असलेल्या व्यक्तीला कायद्यानुसार शिक्षा व्हावी, या अपेक्षेने रूपाली शेट्ये यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आपली व्यथा मांडली आहे.

आजही एका आईच्या हत्येला न्याय मिळण्याची प्रतीक्षा करणारी तिची मुलगी आहे. वर्षभरापूर्वी गमावलेल्या आईच्या हत्येचा उलगडा व्हावा, दोषी व्यक्तीचा शोध घेऊन तिला कायद्यानुसार शिक्षा व्हावी, एवढीच तिची अपेक्षा आहे. एका मुलीने न्यायासाठी केलेली ही आर्त विनवणी पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचून तपासाला गती मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.