खेड, चिपळूणसह गुहागरमधील घटनांनी खळबळ
रत्नागिरी:- जिल्ह्यात अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत ऐन विशीतील तीन तरुणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खेड, चिपळूण आणि गुहागर या तीन तालुक्यांत १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या या हृदयद्रावक घटनांमुळे सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत असून, या तिन्ही प्रकरणांमध्ये आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
पहिली घटना खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे १७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. मूळची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील रहिवासी असलेली दिव्या दत्तात्रय काळे (वय २१) ही तरुणी घाणेखुंट येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. तिने सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या खोलीतील सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. तिला तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही घटना ताजी असतानाच, २० ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील रावळगाव सुर्वेवाडी येथे अमिषा अरविंद सुर्वे (वय २३) या तरुणीने राहत्या घराच्या पडवीत अज्ञात कारणावरून गळफास घेतला. कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी धाव घेतली, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी कार्यात असून चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
तिसरी घटना त्याच दिवशी म्हणजे २० ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे घडली. मूळची कराड येथील रहिवासी असलेली आणि वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी अंजली अमोल पाटील (वय अंदाजे २०) हिने ओझरवाडी येथील भाड्याच्या खोलीत लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिव्या, अमिषा आणि अंजली या तिन्ही तरुणींनी टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित पोलीस ठाण्यांकडून या प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे. शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी झगडणाऱ्या तरुणाईच्या अशा टोकाच्या पावलांमुळे संपूर्ण कोकणात तीव्र चिंता आणि शोक व्यक्त होत आहे.









