दापोली:- गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इनामपांगारी येथील एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुंभवे गावच्या हद्दीतील सामाजिक वनीकरण परिसरातील जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. संतोष जयराम तांबे (वय ५१, रा. इनामपांगारी बौद्धवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून दापोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष तांबे यांना दारूचे व्यसन होते आणि नशेत असताना ते बाहेर कुठेही फिरत असत. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते घरातून दारू पिण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र रात्र उलटूनही ते घरी परत न आल्याने नातेवाईक व कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. संतोष यांचा मुलगा, नातेवाईक आणि परिसरातील ग्रामस्थांनी संभाव्य सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेतला, तरीही त्यांचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता.
अखेर २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कुंभवे गावच्या हद्दीतील सामाजिक वनीकरणाच्या दाट जंगलमय भागात संतोष तांबे हे मृतावस्थेत पडल्याचे शोध घेणाऱ्यांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून नातेवाईक व ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री आठ वाजून दहा मिनिटांच्या सुमारास तपासणी करून त्यांना दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मयताचा देह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक ७९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या दिशेने पोलीस पुढील तपास करत आहेत.









