Tuesday, May 19, 2026
spot_img
Home दापोली दापोली जालगाव येथून बालकाचे अपहरण?

दापोली जालगाव येथून बालकाचे अपहरण?

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील जालगाव येथून १२ वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलोक जयेंद्र मोरे (१२ वर्षे ४ महिने ३ दिवस) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत दर्शन जनार्दन मोरे (३६, रा. जालगाव, ता. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलोक हा १६ मे रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या दरम्यान सायकल फिरवण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र बराच वेळ होऊनहीं तो घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्याचा जालगाव परिसरात, गावात तसेच मित्रपरिवार आणि दापोलीतील नातेवाईकांकडे शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत मुलाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्याच्या अज्ञानाचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्याने कुटुंबियांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.