Friday, October 23, 2026
spot_img
Home लांजा अंजनारी पुलावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात

अंजनारी पुलावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात

मच्छी वाहतूक करणारा कंटेनर उलटला

लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलावर अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने मच्छीची वाहतूक करणारा एक कंटेनर पुलावर अचानक पलटी झाल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वारंवार घडणाऱ्या या अपघातांमुळे अंजनारी पुलावरील सुरक्षा यंत्रणा आणि रस्त्याच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून गोव्याकडे जाणारा कंटेनर (क्रमांक MH 43 BP 1960) आज सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अंजनारी पुलावर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा कंटेनर महामार्गावरच कलंडला. या कंटेनरमध्ये मच्छीचा मोठा साठा भरलेला होता. या वाहनाचे चालक प्रेमशंकर यादव (मूळ रा. उत्तर प्रदेश) हे असून अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्याचे काम हाती घेतले.

विशेष म्हणजे, याच अंजनारी पुलावर सलग दुसऱ्या दिवशी हा अपघात घडला आहे. या ठिकाणी अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस अत्यंत वेगाने वाढत असून हा पूल वाहनचालकांसाठी अक्षरशः अपघात प्रवण क्षेत्र बनत चालला आहे. वळणाचा अंदाज न येणे, वेगमर्यादा आणि तांत्रिक त्रुटी यांमुळे येथे सातत्याने अपघात होत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सलग होणाऱ्या या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने या परिसराची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी आता प्रवाशांमधून आणि स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास तपास अंमलदार वाडकर करत आहेत.