५ हजार उकळणाऱ्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
खेड:- चिपळूण परिसरातील अनधिकृत चिरा दगड खाणींचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मंत्र्यांची भेट घडवून आणण्याच्या बहाण्याने एका सामाजिक कार्यकर्त्याकडून पैसे उकळून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे गृह, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांचा खाजगी सचिव असल्याचे खोटे भासवून पाच हजार रुपयांची रक्कम उकळणाऱ्या रविराज चिखले नावाच्या इसमाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मूळचे बोरगाव साळुंखेवाडी (ता. चिपळूण) येथील रहिवासी व सध्या मुंबई सेंट्रल येथे राहणारे विद्याधर दत्ताराम साळुंखे (वय ५६) यांनी खेड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली आहे. साळुंखे हे ग्रामीण पातळीवर सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून चिपळूण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर चिरा खाणी सुरू असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा मुद्दा त्यांना मंत्री योगेश कदम यांच्याकडे मांडायचा होता. हीच बाब हेरून संशयित आरोपी रविराज चिखले याने आपण ना. योगेश कदम यांचे पी.ए. असल्याचे साळुंखे यांना भासवले. तसेच मंत्र्यांची थेट भेट घडवून आणून चिरा खाणींवरील कारवाईचे काम मार्गी लावून देण्याचे आमिष दाखवले.
या भेटीच्या आणि कामाच्या नावाखाली आरोपीने १७ सप्टेंबर रोजी खेड येथे फिर्यादीकडून रोख पाच हजार रुपये घेतले. मात्र, रक्कम उकळल्यानंतर ना मंत्र्यांची भेट घडवली ना कसले काम केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळुंखे यांनी खेड पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी रविराज चिखले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.









