Tuesday, October 27, 2026
spot_img
Home मंडणगड विजेच्या तारेचा धक्का लागून १० वर्षीय बालकाचा मृत्यू

विजेच्या तारेचा धक्का लागून १० वर्षीय बालकाचा मृत्यू

मंडणगड लाटवण येथील दुर्घटना

मंडणगड:- तालुक्यातील लाटवण येथे विजेच्या मुख्य प्रवाहातील तुटलेली तार पायाला चिकटल्याने बसलेल्या भीषण धक्क्यामुळे एका दहा वर्षांच्या निष्पाप बालकाचा जागीच तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मयुर अनिल पवार (वय १०, रा. लाटवण आदिवासीवाडी, ता. मंडणगड) असे या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण लाटवण परिसरावर तीव्र शोककळा पसरली असून, मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयुर पवार हा ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे सातच्या सुमारास घरातून कोयती घेऊन बाहेर पडला होता. मात्र, दुपारचे दोन वाजले तरी तो घरी परतला नसल्याचे त्याची चुलती लता घोगरेकर यांनी मयुरचे मामा संदीप धाकट्या घोगरेकर यांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थांनी परिसरात त्याचा कसून शोध सुरू केला. शोध सुरू असतानाच, रात्री सुमारे आठच्या सुमारास लाटवण हायस्कूलजवळील बांबूच्या बेटाजवळ असलेल्या सिमेंटच्या इलेक्ट्रिक पोलजवळ मयुर उताण्या अवस्थेत पडलेला प्रशांत गंगाराम पवार यांना दिसून आला.

स्थानिकांनी जवळ जाऊन पाहिले असता, विजेच्या मुख्य वाहिनीची तार मयुरच्या दोन्ही पायांना चिकटलेली होती. विजेच्या अतिउच्च दाबाच्या प्रवाहामुळे त्याच्या दोन्ही पायांना गंभीर भाजल्यासारख्या जखमा झाल्या होत्या आणि विजेचा जोरदार झटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. संदीप घोगरेकर यांनी दिलेल्या माहितीवरून मंडणगड पोलिसांनी बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १८/२०२६ नुसार नोंद केली असून, पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत.