चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील दहागाव परिसरातील हॉटेल चवदारच्या पुढील वळणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एस.टी. बसने दुचाकीला धडक दिल्याची दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतिष नथुराम साळुंखे (वय ४५ वर्ष, रा. धुत्रोली) हे ३० जुलै २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील युनिकॉर्न दुचाकी (क्र. एमएच/०२/बीएन/१७९६) ने कामानिमित्त दापोलीकडे चालले होते. ते दहागाव येथील हॉटेल चवदारच्या पुढील वळणावर आले असता, दापोलीकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी एस.टी. बस (क्र. एमएच/०९/ईएम/९६०७) चे चालक संदेश रमेश निवळकर (रा. एस.टी. आगार दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील बस हयगयीने व वेगाने चालवून सतिष साळुंखे यांच्या दुचाकीच्या हॅण्डलला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे फिर्यादी सतिष साळुंखे यांचा चेहरा बसला घासत जाऊन ते उजव्या बाजूला दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला, उजव्या हाताला, कमरेला, खांद्याला, चेहऱ्याला, उजव्या बाजूस डोक्याला तसेच डाव्या हाताला व पायाला गंभीर दुखापत होऊन ते घाईने जखमी झाले आहेत.
या प्रकरणी जखमी फिर्यादी सतिष नथुराम साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३० जुलै २०२६ रोजी रात्री ७:०५ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८५/२०२६, भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









