पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मंडणगड:- केळवत घाटातील माळराण हॉटेलसमोर भरधाव वेगात जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप चालकाने रॉग साईटला येऊन दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सयाजी चव्हाण (वय ५५, रा. बामणघर, पोस्ट कुंबळे, ता. मंडणगड) हे फिर्यादी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या ताब्यातील अॅक्टिवा मोटारसायकल (क्र. MH-08 AR-7352) वरून मंडणगड येथे येत होते. त्यावेळी केळवत घाटातील माळराण हॉटेलसमोर आले असता, मंडणगड दिशेकडून भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीच्या (क्र. MH-05 FJ-3806) चालकाने आपली गाडी हयगयीने, बेदरकारपणे व अतिवेगात चालवून रॉग साईटला आणली आणि फिर्यादीच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार राजेश सयाजी चव्हाण व त्यांच्या पाठीमागे बसलेले नरेश गणपत जाधव हे दोघे जण लहान-मोठ्या दुखापतीमुळे जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
या अपघाताप्रकरणी पिकअप चालक किसन कडाप्पा गायकवाड (रा. वाशी, नवी मुंबई) याच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा (मो.वा.का.) कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.









