Wednesday, September 30, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जिल्ह्यातून एकाच दिवशी सहाजण हद्दपार

जिल्ह्यातून एकाच दिवशी सहाजण हद्दपार

आजअखेर एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण २१ जणांवर हद्दपारीची कारवाई

रत्नागिरी:- एनडीपीएस कायद्यांतर्गत अंमली पदार्थांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू असून, २३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी सहा जणांना रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. सन २०२३ पासून आजअखेर एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण २१ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी दिली.

नार्को को-ऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. या बैठकीत प्रांताधिकारी देसाई यांनी एनडीपीएसअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.

देसाई यांनी सांगितले की, नार्कोटीक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ॲक्ट, १९८५ अंतर्गत २३ सप्टेंबर रोजी सचिन राजाराम म्हापूसकर, अरमान लियाकत धामस्कर, नजब असीफ मिरजकर, मस्तान मकदुम शेख, फुरकान यासिन फणसोपकर आणि अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकर या सहा जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी समितीशी संबंधित प्रत्येक विभागाने वर्षभराचे नियोजन करून आपापल्या जबाबदाऱ्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या. या समितीच्या कामकाजावर केंद्र आणि राज्य शासनाकडून सनियंत्रण केले जाते. त्यामुळे संबंधित सर्व विभागांनी सोपविण्यात आलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.