Tuesday, September 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी परचुरी येथे ग्रामदेवतेच्या मंदिराची चोरी

परचुरी येथे ग्रामदेवतेच्या मंदिराची चोरी

३२ हजारांचे दोन अँप्लिफायर लांबवले

गुहागर:- गुहागर तालुक्यातील परचुरी येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिराचे टाळे किंवा कडी तोडून आत प्रवेश करत अज्ञातांनी ३२ हजार रुपये किमतीची दोन अँप्लिफायर मशिन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा चोरीचा प्रकार दिनांक २६ सप्टेंबर रोजी रात्री ०९:०५ वाजे ते ९:३० वाजण्याच्या दरम्यान परचुरी येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरात घडला. फिर्यादी रामचंद्र आडविलकर (वय ५१, व्यवसाय- शेती, रा. परचुरी भुवडवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपीने मंदिराच्या परिसरातून काळ्या रंगाच्या आहूजा कंपनीच्या दोन अँप्लिफायर मशिन, ज्यांची एकूण किंमत ३२,००० रुपये आहे, त्या कोणाच्याही लक्षात न येता चोरून नेल्या.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात दिनांक २७ सप्टेंबर रोजी रात्री ७:५९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं. ९८/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५(अ) आणि जुन्या भा.द.वि.क. ३८० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून, मंदिरातील साहित्याची चोरी करणाऱ्या अज्ञात चोराचा शोध पोलीस घेत आहेत.