नगरपालिका प्रशासनाचा निर्णय; रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण, नागरिकांना सहकार्याचे आवाहन
रत्नागिरी:- गणेशोत्सवाला शहरात उत्साहात सुरुवात झाली असून, शनिवारी (ता. १९) होणाऱ्या गौरी-गणपती विसर्जनाची सर्व तयारी नगरपालिकेतर्फे पूर्ण करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिली आहे.
नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या विविध मागण्या व तक्रारींची तात्काळ दखल घेण्यात आली आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी ६ फूट व त्यापेक्षा कमी उंचीच्या सर्व पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पार पाडण्यासाठी निश्चित केलेल्या विसर्जन स्थळांवर सर्व आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
विसर्जन मिरवणुकीच्या वेळी गर्दी टाळावी, सार्वजनिक स्वच्छता राखावी आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.
शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात वर्दळ वाढल्याने पशुपालकांनी आपल्या मालकीची जनावरे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मोकाट सोडू नयेत, असा सज्जड दम व इशारा नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.









