रत्नागिरीत एलईडी, मिनी पर्ससीन नौकांवर कारवाईची मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरी परवाना अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेली बेकायदेशीर एलईडी लाईट (विजेच्या प्रखर झोत) मासेमारी आणि मिनी पर्ससीन (रिंग सीन) मासेमारी तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी जयहिंद मच्छिमार सहकारी संस्था, भाटीमिऱ्या यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मिरकरवाडा बंदरात काही यंत्रचलित नौका ६ ते ७ वाव खोल पाण्यात एलईडी लाईट लावून बेकायदेशीर मासेमारी करत आहेत. या नौका मिरकरवाडा बंदरात मासळी खाली करत असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. राज्याच्या जलधी क्षेत्रात म्हणजेच १२ नॉटिकल मैलांच्या आत, सुमारे ७ ते ८ नॉटिकल मैलांमध्ये मिनी पर्ससीन जाळ्यांचा वापर केला जात आहे. या जाळ्यांची साईज (आस साईज) १८ ते २० मिमी एवढी अत्यंत लहान असून, शासकीय नियमांनुसार यावर बंदी आहे. यामुळे अगदी लहान मासे मारले जातात व त्यांचा वापर ‘फिशमील’साठी केला जातो, ज्यामुळे मत्स्यसंपदेचा मोठा ऱ्हास होत आहे. मिनी पर्ससीन मासेमारीवर शासकीय बंदी असतानाही शेकडो नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करून बंदरात राजरोस मासळी उतरवत आहेत. या बेकायदेशीर मिनी पर्ससीन नौकांवर दंडात्मक कारवाई केल्यास शासनाच्या तिजोरीत लाखोंचा महसूल जमा होईल आणि पारंपरिक मच्छिमारांना दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच १ सप्टेंबर २०२६ पासून आजपर्यंत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या किती नौकांवर ड्रोनद्वारे किंवा गस्ती नौकांद्वारे कारवाई करण्यात आली, याची माहिती मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. हे निवेदन जयहिंद मच्छिमार सहकारी सोसायटीचे सचिव दत्तगुरू कीर यांनी दिले. हे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मत्स्यव्यवसाय आयुक्तांना दिले आहे.
मासेमारी हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू झाला असून पहिल्या महिन्यातच एलईडीद्वारे मासेमारी सुरू झाल्याने छोट्या मच्छीमारांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी.
- –दत्तगुरू कीर, सचिव, जयहिंद मच्छिमार संस्था
समुद्रात रात्री विशेष गस्त: सावंत
एलईडी लाईट वापरून होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने कडक पावले उचलली असून, समुद्रात रात्रीच्या वेळी विशेष गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसा समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोणचा वापर प्रभावी ठरत आहे. नुकत्याच झालेल्या पाहणीत काही संशयास्पद बाबी आढळल्याने त्यानुसार केसेस नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी जीवन सावंत यांनी दिली.









